(१९८३ साली डिसेम्बर मध्ये मी IIT तील काही मित्र मैत्रिणींबरोबर एका ट्रेकला गेलो होतो. त्या वेळची ही एक आठवण. )
रायगडाचा निरोप घेऊन आम्ही १८ जणांनी राजगडाच्या दिशेने कूच केले. काही वेळानंतर एका मार्गाने घळीतून डोंगर चढायला आम्ही सुरुवात केली. जवळ जवळ तासभर चढ चढल्यावर वाट खूपच कठीण होत गेली. थोड्याच वेळात आमच्या लक्षात आले की आम्ही घेतलेली ही वाट म्हणजे खरी वाट नसून एक सुकून गेलेला ओढा होता. कडा चढण्याची खरी वाट बहुदा पुढच्या घळीतून गेली होती. पण आता सावरायला खूप उशीर झालेला होता. एवढे चढलेले उतरून जाणे शक्यच नव्हते. पण ओढा सोडून दुसरा मार्गही शक्य नव्हता. दोन्ही बाजूंना जंगल भरलेले होते. त्यातून वाट काढणे शक्य वाटत नव्हते. प्राप्त परिस्थितीत आहे त्या मार्गाने ओढ्यातूनच पुढे चालत / वर चढत राहणे भाग होते.
डिसेम्बर महिना असूनही ऊन बऱ्यापैकी तळपत होते. लवकरच लक्षात आले की आमच्याकडील बहुतेकांकडील पाण्याचा साठा संपत चालला होता. आमच्या नायकाने मग सूत्रे हाती घेतली व सर्वांना आपल्या जवळील पाणी जरा जास्तच काळजीपूर्वक वापरण्याची विनंती, नव्हे आज्ञाच केली. पण ऊन मी म्हणत होते व हळू हळू उर्वरित पाणीही लवकरच संपून गेले.
ओढ्याने जरा आणखी उभा चढ घेतला होता. त्यामुळे आमची मार्गावरची प्रगती कमी होत गेली. पण प्रगतीप्रमाणेच पाण्याची गरज ही कमी होत गेली. सुदैवाने सूर्य मावळतीला कलला होता व त्यामुळे त्याचा ताप व त्यामुळेच पाण्यासाठीचा कंठशोष ही कमी कमी होत गेला.
पण कोणत्याही गोष्टीत जसे काही फायदे असतात तसेच थोडेफार तोटेही असतात. किंबहुना फायद्यांवर लक्ष ठेवून तोट्यांकडे दुर्लक्ष करून धीर न सोडता, आहे त्या परिस्थितीत मार्ग क्रमत राहणे हेच केंव्हाही श्रेयस्कर असते.
ऊन कलल्यावर लगेच प्रकाश कमी होत गेला. लवकरच काळोख पडण्याची लक्षणे दिसू लागली, पायाखालची वाट अंधारून येऊ लागली. ओढ्याने आता एका सुक्या धबधब्याचे “कडे” रूप धारण केले होते. आमच्यातील काही पहिलटकर व पहिलटकरणी धीर सोडू लागले होते. तेंव्हा आमच्या नायकाने मग सांगितले की अशा धबधब्याचा अर्थ आहे की आपली चढाई आता संपत आली आहे व या धबधब्यानंतर आपण पठारावर पोहोचू. झाडांच्या डोक्यावरून दिसणारे आकाशही हेच सुचवत होते. पठारावर लवकरच आपल्याला गाव लागेल याची त्याला खात्री वाटत होती.
आमच्यातील नवशिक्यांना तो ओढा चढून जाणे फार कठीण व भीतीदायक वाटत होते.
त्यामुळे ट्रेकिंग मधील experts मग प्रस्तर-रोहन (rock climbing) करत वर चढून गेले व त्यांनी दोर खाली सोडला. त्या दोराला धरून इतरांच्या मदतीने मग सर्वजण वर चढून गेले. बहुतेक नवशिक्यांनी आपल्या सामानाच्या sacks मागे ठेवल्या होत्या. त्या वर आणण्यासाठी काही जणांना मग अधिक वेळा वर खाली करणे भाग पडले. कसेबसे आम्ही ओढ्याचा कठीण भाग दोरीच्या सहाय्याने चढून आता थोड्या फार सपाटीवर आलो हा त्यातल्या त्यात एक चांगला भाग वाटत होता.
आमच्या जवळील एकाकडे सरबताच्या ७५० मी लि च्या दोन बाटल्या होत्या. पण त्या अगदी शेवटचा उपाय म्हणून आणीबाणीसाठी राखून ठेवण्याचे धोरण नायकाने बाळगले व राबवले होते. पण आता पठारावर आल्यामुळे ट्रेकचा गंभीर भाग संपला होता असे त्या वेळी तरी सर्वांचे मत पडले होते. त्यामुळे सरलेल्या / टळलेल्या संकटाच्या नावे व सेलिब्रेशन म्हणून त्या आता उघडण्याचे सर्वानुमते ठरले. १५०० मिली व १८ माणसे म्हणजे साधारणतः ८० मिली प्रत्येकी सरबत देण्याचे ठरले. सुनील ने बाटल्या बाहेर काढल्या व तो एक बाटली उघडू लागला. बुच उघडले व त्याने बाटली ओतण्यासाठी पुढे केली. पण काय होते ते कळायच्या आधीच ती बाटली त्याच्या हातून सुटली व खाली खडकावर आपटून खळकन फुटली. त्या काळी आजच्या सारख्या प्लास्टिकच्या बाटल्या सर्रास वापरात नव्हत्या. प्रत्येकी ८० मिली सरबत खळकन ४० मिली वर आले. सुनीलवर अर्थातच शिव्यांचा वर्षाव झाला.
सरबत पिण्यात व सुनीलशी वाद घालण्यात आणखी बराच काळ निघून गेला होता व आता पूर्ण काळोख पडला होता. वाट पूर्णपणे अंधारात बुडाली होती. तरी आम्ही पायवाटेने पुढे चालणे सुरु ठेवले. पण अर्धा तास चालूनही गाव किंवा मनुष्यवस्ती यांचा काहीच पत्ता नव्हता. हाकारे / कुकारे बरेच घालून झाले. पण त्याला प्रतिसाद मात्र येत नव्हता. सर्वजण आता कंटाळून गेले होते. भूक व तहान यांनी सगळे आता व्याकूळ झाले होते. शेवटी एके ठिकाणी बरीचशी सपाट व मोकळी जागा आल्यावर तेथेच तंबू टाकायचं ठरलं. खरंतर तंबू वगैरे काही नव्हते आमच्याकडे. कारण मुक्काम साधारणतः देवळात किंवा कुणाच्यातरी पडवीत होत असे. पण तेथे रात्र घालवण्याचे ठरले म्हणा ना.
आता मुख्य गरज होती ती पाण्याची सोय करण्याची. पाणी मिळणारच हे गृहीत धरून मग नायकाने जेवणाची व्यवस्था करण्यास सुरुवात केली. चुलीसाठी दगड व सर्पणासाठी लाकडे शोधण्यासाठी तुकड्या पाडण्यात आल्या. आम्ही काही जण पाण्याच्या शोधार्थ काही मोठी व काही लहान भांडी / बाटल्या घेवून निघालो. प्रथम एक बारीकसा पाण्याचा स्रोत लागला. त्यातून थेंब थेंब पाणी गळत होतं. तेथे खाली एक पातेले लावून ठेवले. जवळच एक डबके होते. त्यातील पाणी खूपच गढूळ / घाणेरडे वाटत होते. गुरांच्या खुरांचे सर्वत्र उमटले होते. पण आहे त्या परिस्थितीत आम्हाला काहीच पर्याय नव्हता. थोडं पुढे खालच्या बाजूला जरा त्याहून चांगले वाटणाऱ्या पाण्याचे आणखी एक छोटेसे डबके सापडले. मग त्यातही पाण्याची प्रतवारी करण्यात आली. अगदीच अस्वच्छ पाणी धुण्या-भांड्यांसाठी, त्यातल्या त्यात बरेसे वाटणारे पाणी चहासाठी व उकळण्यासाठी / जेवणासाठी व त्याहून चांगलेसे पाणी (मुख्यतः थेंब थेंब गळं पातेल्यातील) आहे तसेच पिण्यासाठी असे विविध प्रकारचे ५-१० लि पाणी घेऊन आम्ही परतलो. तोवर इतरांच्या तोंडचे पाणी अक्षरशः पळाले होते. पण आमच्याकडील पाण्याची भरलेली भांडी पाहून सर्वांचा जीव भांड्यात पडला. त्यातील काही जणांनी (मुख्यतः मुलींनी) टूम काढली की चला आम्हीही तिकडे येतो म्हणजे आम्हाला तेथेच जास्त पाणी पिता येईल, स्वच्छपैकी हात पाय तोंड धुता येतील . पण त्या पाण्याचा स्रोत पाहून बऱ्याच जणांनी ते पिण्यास सोडा पण त्याला स्पर्श करण्यासही नकार दिला असता याची आम्हा पाणक्यांना पूर्ण जाणीव होती. त्यामुळे खूप प्रयत्नांनी त्यांचे मन वळवून त्यांना चहाची तयारी करण्यास नायकाने भाग पाडले.
काही जणांनी आता जेवणाची सुरुवात केली. चहा पिऊन आम्ही पाणके पुन्हा जास्त पाणी आणण्यास निघालो. इतरांना आमच्या मदतीसाठी न नेण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागले. तेंव्हा मग एका मुलीने त्याचा अर्थ ओळखला. ती म्हणाली “बहुदा ते अशा प्रकारचे पाणी आणत असावेत की ते आपण न पाहिलेलेच बरं.” त्यानंतर मात्र कोणीही पाण्यासाठी आमची मदत करण्याचा विषय पुन्हा काढला नाही. दोन तीन चकरा मारल्यावर उदंड पाणी झाले. अगदी सर्वांना हात पाय सुद्धा थोडेफार धुता आले. जेवणानंतर भांडी मात्र त्या डबक्या जवळ नेऊन धुतली.
त्यानंतर अर्थातच शेकोटी, गाण्याच्या भेंड्या, मूकाभिनय इत्यादी सर्व प्रकार झाले. आता रात्रीचे अकरा वाजत आले होते. पण झोपायला मात्र कोणीही तयार होत नव्हते. संध्याकाळीच गप्पांच्या ओघात कुणी म्हणाले होते की मागच्याच वर्षी काही जणांनी या परिसरात वाघ पाहिला होता. त्या भीतीमुळे कुणाची झोपायची हिम्मत होत नव्हती.
दूरवर भजनाचा / टाळांचा गजर अंधुकसा ऐकू येत होता. त्या आवाजाच्या मागाने आपण वाट काढत गेलो तर गावात पोहोचू व शांतपणे सुरक्षित तेथे झोपू असे काही जणांना वाटत होते. पण काहींना मात्र आपण आहो ती चांगली जागा सोडून त्या मार्गाने जाणे चुकीचे वाटत होते. शेवटी बहुमताने आहो तेथेच रात्र काढण्याचे ठरले.
वाघ विस्तवाला / आगीला घाबरतो म्हणून रात्रभर शेकोटी पेटत ठेवण्याचे नक्की झाले. त्यासाठी जास्तीची लाकडे शोधून आणली. शेकोटीभोवती sacksचे वर्तुळ करून त्याच्या मध्ये झोपायचे व दोघा-चौघांनी आळीपाळीने जागून पहारा द्यायचे व वाघाची चाहूल लागलीच तर आरडाओरड करून सर्वांना जागे करायचे असं ठरले. ब्रिज खेळणाऱ्या आम्हा चौघांचा अर्थातच पहिल्या पाळीत आपोआपच समावेश झाला. बऱ्याच वेळानंतर असे लक्षात आले की बहुतेकजण डोळे मिटले तरी जागेच होते. पण मग साधारणतः १२-१ नंतर हळूहळू भीतीची जागा झोपेने घेऊन बहुतेक जण निद्रादेवीच्या आधीन होत गेले. आमचा ब्रिजचा डावही खूप रंगात आला. साधारणतः ४ – ४।। च्या सुमारास अगदी सुरुवातीला झोपलेली काही मंडळी जागी झाली व त्यांनी पहाऱ्याची जबाबदारी त्यांच्या अंगावर घेतल्यामुळे आम्ही ब्रिजवासी आता झोपायला मोकळे झालो. पहाटेच्या मंद वाऱ्यात डोळे कधी मिटले ते लक्षात ही आले नाही.
सकाळी उजाडल्यावर एक एक जण उठू लागले. पुन्हा एकदा चहा नाश्ता झाला व आम्ही पुढच्या मार्गाने कूच केले.
जाता जाता आम्ही त्या पाण्याच्या डबक्याजवळ आलो. रात्रभराच्या विश्रांतीनंतर ते पाणी आता निवळले होते व फारच स्वच्छ दिसत होते. कालची शंका घेणारी मुलगी मग आपण ती शंका उगीचच घेतली म्हणून आमची क्षमा मागू लागली तेंव्हा ‘झाकली मूठ’ न्यायाने आम्हीही अळीमिळी गुपचिळी बाळगली.
अर्ध्या तासाच्या चालण्यानंतर आम्ही गावात पोहोचलो तेंव्हा काही गावकरी म्हणाले की काल रात्री तुम्हीच कुकारे घालत होता का? आम्हाला एकदा वाटले की मदतीला यावे पण मग ते कुकारे थांबले व आम्ही नाद सोडला.
आपण जरा जास्त प्रयत्न केले असते तर बरे झाले असते. कालची रात्र जरा जास्त आरामात गेली असती असे आमच्यापैकी बहुतेकांना वाटले असणारच. पण मग आम्ही कालच्या विलक्षण अनुभवला ही मुकलो असतो. नाही का?
आज जवळजवळ अडीच तपानंतर तपांनंतर सुद्धा तो अनुभव पूर्णपणे लक्षात आहे. आयुष्यातील असे अविस्मरणीय अनुभव हेच खरं जगणं नाही का?




















